शुक्रवार, १५ मार्च, २०१९

अपूर्वाई.......नवं शिकण्यातली


अपूर्वाई.......नवं शिकण्यातली

एका इंग्रजी पुस्तकात मी एक वाक्य वाचलं होतं " When was the last time, when you did something new"
तुमचं वय कुठे थांबलं, या विषयी हे वाक्य मला फारच पटलं. त्याच स्फुर्तीने आज प्रथमच मी असा लेखन स्पर्धेत भाग घेतला.
मला वाटतं की माणसाची उन्नती दोन प्रकारे होत असते.एक उभ्या रेषेत आणि दुसरा प्रकार आडव्या रेषेत. उभ्या रेषेवरची व्यक्ती आपली आवड क्षणभर बाजुला ठेवतो आणि ध्येय वा महत्वाकांक्षा निश्चित करून त्या दिशेने सरळ यशाची शिखरे पार करत रहाते.
आडव्या रेषेवर अनेक पर्याय खुणावत असतात. सगळे आजमावण्याची खुमखुमी असते. त्यातून घडणारा माणूस अधिक अनुभव संपन्न असतो.
तो विविध क्षेत्रात मुसाफिरी करतो.
मला स्वतःला आडव्या रेषेवर रहायला आवडते.
माझ्या सुदैवाने मला ९ ते ५ नोकरी करावी लागली नाही. एकत्र कुटुंबात लहानपण गेलं आणि सासरीही एकत्रच. घरातील कामे, येणीजाणी, सण समारंभ यात आम्ही सर्वजणी व्यस्त असायचो. पण त्याचवेळी, संपूर्ण जबाबदारी अनेकांमध्ये विभागली गेल्यामुळे फावल्या वेळात मन ही रिकामे आणि शांत असायचे.लिखाण, वाचन ही माझी आवड आहे. ते मी करत राहिले. लिखाण छापून आणणे, त्यातून अर्थार्जन वा प्रसिद्धी मिळवणे हा विचारच नाही. एखादा विषय डोक्यात यावा, तो मनात घोळवावा, मनासारखा सजला की कागदावर उतरवून ,निर्मितीचा सोहळा संपवून शांत व्हावे. तोवर दुसरा विषय खूणवू लागे.
माझी जाऊ हरहुन्नरी. भरतकाम,विणकाम, शिवण सगळ्यात पारंगत. तिच्या बरोबर साड्या भरल्या, स्वेटर विणले. पण यातली कलात्मकता माझ्यात नाही. मी करू शकते पण मला सुचत नाही.
बागकाम करताना ,नवीन आणलेले प्रत्येक रोप रुजवताना आणि मोठे होताना पहाणे हा सृजनाचा अविष्कार खूप उर्जादायी असतो.
अशी ही नवं काही शिकण्यातली अपूर्वाई मला आवडते.
आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या शैक्षणिक प्रयोगाची. २००५-०६ दरम्यानचा ही गोष्ट आहे.माझ्या भावाची मुलगी CA Entrance परीक्षा पास झाली. मी तिला बरेच मार्गदर्शन केले असल्याने ती रिझल्ट घेऊन प्रथम माझ्याकडे आली. कुठे articleship करायची वगैरे चर्चा चालू असताना ती म्हणाली "आत्या, तू पण दे ना तुझे राहिलेले final CA चे पेपर माझ्या बरोबर. आपण एकत्र अभ्यास करू ."
१९८८ साली मी CA Inter झालेनंतर एक दोन attempt प्रयत्न करून CAचा नाद सोडून दिला होता. सगळ्याच गोष्टी करायची हौस आणि अभ्यास करण्याचा कंटाळा ही तात्कालिक कारणे.असो.
मन कधीतरी खात रहायचे. आपण एवढा अभ्यास केला पण पूर्णत्वास नेले नाही. आज परत सगळे विचार मनात घोळायला लागले. माझी मुलगी बारावीत होती.तिने प्रोत्साहन दिले. नवरा माझी धरसोड सवय लक्षात घेऊन म्हणाला, "नेटाने पूर्ण करणार असशील तरच कर" असे विविध पडसाद उमटले.
CA पूर्ण करायचे ठरवून टाकले. Institute मधे जाऊन study material घेऊन आले. त्यानंतरचे संपूर्ण वर्ष भारावलेले होते.वेळापत्रक बनवणे , ते पाळण्याचा आटोकाट प्रयत्न, घाटकोपरला क्लास लावला. आणि घरातली कामं. मी खरंच माझे वय विसरून गेले. मी पहील्या दिवशी क्लासमध्ये शिरले तर सगळे जण माझ्याकडे पहातच राहिले .या बाई कोण? मला थोडाही complex आला नाही कारण या नवीन प्रयोगाची प्रचंड ऊर्मी. रेल्वे प्रवासाची सवय नसलेली मी भर गर्दीच्या गाड्या पकडून घाटकोपरला जात होते.
अभ्यास करताना मला लक्षात आलं, वाढलेल्या वयामुळे माझी आकलनशक्ती प्रगल्भ झाली होती. Accounts हा माझ्या हातचा मळ होता. बाकी विषयाचा अभ्यास कसा करायचा हे मला भाचीने शिकवले. तिचा रोज सकाळी ९ वाजता फोन यायचा ."आत्या माझा तीन तास अभ्यास झाला". मी अजून घरकामात च असायचे. मग मात्र दिवसभर अभ्यास. त्याकाळात माझ्या घरकामाला ही शिस्त लागली.प्रचंड एनर्जीने मी दोन्ही गोष्टी करत होते.
सहा महिने झाले .हाॅलतिकीट, सेंटर वगैरे सोपस्कार झाले आणि परीक्षेचा पहीला दिवस.घरात सगळे चेष्टेने विचारत होते , पेन पेन्सिल पट्टी घेतली का ?
परीक्षागृहात शिरून बेंचवर बसल्यापासून प्रत्यक्ष पेपर हातात येईपर्यंत वेळ ही खरी stress test .पेन्सिलीने उत्तरपत्रिकेवर रेषा आखताना मनात आले " सुखाने संसार करत होते कशाला या नसत्या भानगडीत पडले." आजही आठवले की मला टेन्शन येतं.
पहिल्या ग्रुपचे चारही पेपर झाले. साईसुट्ट्यो !
या नव्या अभ्यासानं मला खूप काही दिलं.
आपल्या बुद्धीमत्तेवरचा विश्वास वाढला, आपली तर्कशक्ती, स्मरणशक्ती पाहीजे तेवढी वाढू शकते , तरुण मुलांच्या बरोबरीने आपण calculations करू शकतो हा आत्मविश्वास आला.
परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मी पास झाले.तेव्हा माझे वय ४० होते पण शैक्षणिक क्षमता पंचविशीत म्हणजे ताज्यातवान्या होत्या, हे सिद्ध झाले. खूप चांगला अनुभव होता.
नव्याची आस ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. पैसा आणि प्रसिद्धीच्या नादात या उर्मी दाबून टाकू नयेत. आयुष्य फुलविण्यासाठी त्या आवश्यक आहेत. उतारवयात हे अनुभव आपल्याला उर्जा देतील. नवनवोन्मेषानी भरलेली आपली आयुष्याची बाग मागे वळून पाहताना खूप आनंद देते.
बा.भ.बोरकरांची कविता आठवते
" देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलानी गंधलेले सुंदराचे सोहळे "

सौ.नंदिनी पित्रे
८०२, लक्ष्मी बाग इस्टेट,
फडके रोड डोंबिवली( पूर्व).
फोन नं : ९८२१८०८५५९.

बुधवार, ३० जानेवारी, २०१९

सकारात्मकता

सकारात्मकता
पावलापावलांवर जिथे लागतात ठेचा
कसा मिळणार तिथे 'स'काराचा वसा॥

जेव्हा प्रत्येक गोष्टच होते विरोधक
तेव्हा कसा होईल विचार सकारात्मक ॥

असं निराश होऊ नका,एक गोष्ट विसरू नका
'स'कार सार्या सृष्टीतला
'न'कार फक्त माझ्या मनातला
विचार माझ्या मनातला, विकारही माझ्याच मनातला
विचाराने विकारांवर होऊया स्वार
पाहू भेटतो का सृष्टीतील सकार॥

संकल्प माझ्या मनातला, विकल्प ही माझ्या मनातला
विकल्प सोडून संकल्पाची धरू या आस
सकाराकडे नेणारा हाच मार्ग खास॥

मननही माझेच, हननही माझेच
मननाने स्वतःला सांभाळायचे
हननापासून सावरायचे॥

संवर्धनही मीच आणि स्खलनही माझेच
मनानेच ठरवायचे, यातले काय निवडायचे ॥

सकार आणि नकार माझ्याच मनाचे खेळ
नको दवडू व्यर्थ वेळ॥

आजही तितकीच सुंदर आहे मावळतीची लालीमा
तितकाच सुंदर आहे पौर्णिमेचा चंद्रमा ॥

मनाला मोहरणारा ओल्या मातीचा सुवास
मग मीच का उदास
निघ आणि फिर रानांवनांतून श्रावणसरी झेलत
घे ना मोकळा श्वास ॥

नकाराकडून सकाराकडे बांधुया विचारांचा सेतू
कारण वास्तू म्हणत असते तथास्तु तथास्तु ॥

नंदिनी




रविवार, २० जानेवारी, २०१९

आई

'मातृदेवो भव ', 'आईसारखे दैवत'
यासारख्या म्हणींमध्ये मावेल का आईची महती
आजवर म्हटलेल्या 'आई ग' ची होईल का गणती॥

ओठांवरचा पहिला उच्चार 'आई'
पाटीवरचा पहिला आकार अ 'आई'
मनामधला पहिला आधार 'आई'
भावनांचा पहिला हुंकार सुद्धा 'आई'॥

मी आनंदाने ओरडते 'आई ग'
भीतीने थरारते 'आई ग'
करुणेने ह्ळहळते 'आई आई ग '
वेदनेवरची फुंकरसुद्धा 'आई गं '॥

जेव्हा समजते तुझ्यामधली ताकद तेव्हा सुद्धा
आश्चर्याने म्हणते 'आईशप्पथ'
कशी करु या सगळ्याची किंमत?
पण विश्वासानं जेव्हा मुलं म्हणतात मला 'आई'
कणाकणाने होते तुझ्या ॠणातून उतराई॥

नंदिनी 

रविवार, १३ जानेवारी, २०१९

पुरीया

आज इथे राऊळात दरवळतो पुरीया
सांजसमयी सुखवितात अंतरास सूर या॥

चैतन्य तुझे गाभारी, आस आमुच्या मनी
तुझ्याच साठी नटली ही मैफल सूर देवूनी
एकवार तूच ये आशिर्वच द्यावया
आज इथे राऊळात दरवळतो पुरीया ॥
सांजवेळी सूर माझे उजळतील कातर मन
आरंभी पुरीया अंती होतील यमन
मैफिल ही अर्पिली तुझ्याच ठायी गिरण्या
आज इथे राऊळात दरवळतो पुरीया ॥
नंदिनी 

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

संवादाचे झाड
घरात जाण्यापूर्वी आपले सर्व त्रास बाहेर एका झाडावर ठेवून जायचे आणि परत बाहेर पडताना आपल्या खांद्यावर घ्यायचे .अशी कविता watsapp वर आली होती .ती कल्पना मला काही पटली नाही म्हणून मी संवादाचे झाड माझ्या घरी लावले

त्रासाचे  झाड़ मी watsapp वर वाचलं
आपणही प्रयोग करावा मनात म्हटलं.
प्रॉब्लम्स ना बाहेर ठेवलं लटकवत
तर सारखे बाहेरून होते खुणावत.
आत शिरताच मुलगी आली धावून
'काय झाले ग'  मी विचारले जवळ घेऊन.
काही नाही ग..तसं काही नाही खास
पण  तू आलीस ना प्रॉब्लेम खल्लास.
हसून थोडं,दिला हाती थंड पाण्याचा ग्लास
'आता नो प्रॉब्लेम'नवऱ्याला वाटे विश्वास.
आजोबा आजी नी जेवताना विचारले
बोला सगळ्यांनी दिवसभर काय काय केले?
प्रत्येकाने आपला दिवस सांगितला
बोलता बोलता तणावांचा निचरा होत गेला.
झोपताना नवरा म्हणे,'बोला काय झालंय'
इथेच वीरघळला त्रास, जेव्हा त्याने मन माझे वाचले.
दुसरे दिवशी ऑफीसला जाताना झाडावर बघितले,
इथे लटकणारे त्रास कुठे बरं गेले ?
कळले नसतील कदाचित प्रश्न एकमेकांचे 
पण खात्री पटली घरातच मिळू शकते उत्तर त्यांचे .
सवांदाचे झाड़ आम्ही घरातच लावले
त्रासाचे झाड़ मुळांपासून उन्मळले.

नंदिनी पित्रे 

सोमवार, २ एप्रिल, २०१८

एकदा तरी भीड

पावसाळी राहू नकोस कोरडा
किती जपशील स्वतः ला ,
 तू तर येशी उघडा जाशी उघडा ॥

चंद्र तर तिकडे आभाळी, अवसेला तर रात्र काळी
तुझ्या तेजाने तूच का नाही सर्व दिशा उजळी ॥

आणू नको नयनी तुझे दुःख लाखमोलाचे
जिणेच सारे होऊन बसेल कवडीमोलाचे ॥ 

मिटले ओठ तसेच रहातील मुडपून
 विलग केलेस तर हास्य येईल खूलून ॥

सुंदर साजरा श्रावण होईल ना नाराज
चल बाहेर पड सृष्टिला न्याहाळ आजच्या आज ॥

मैत्री प्रेम आठवणी येईल सगळं मागून
त्यासाठी एकदा तरी भीड़ सर्वस्व सोडून ॥

नंदिनी

सोमवार, २६ मार्च, २०१८

नव रसांचे रसग्रहण

नव रसांचे रसग्रहण
वीर रस
बाहु स्फूरले ,हृदय चेतविले
कार्य करण्या सिद्ध झाले
ऐकता वीर रस वाणी ॥
असे पोवाड्याचि हाक ,
ढोल डफावरची थाप
अवतरेल रणरागिणी ॥
मनाचा खड्ग करुनी
चित्ताची ढाल धरुनी
जाऊ याच उपाये तरूनी
श्रीरामा , वीर रस तुज अर्पण ॥

अद्भुत
चकित झाली सृष्टी
विचारांची सरली गती
ऐसे चमत्कार घडती
यासी अद्भुत ऐसे नाव  ॥
भूत लोकां नाही कळले
विवेकबुद्धीसी सम्भ्रमिले
चेतनेसी स्पर्शून गेले
ऐसे अघटीत घडले तो प्रकार अद्भुत ॥
स्वतः  घ्यावी अनुभूती !!!!!!
नको त्याची अभिव्यक्ति
प्रसन्न करि मनासी  ती अद्भुत गोष्ट ॥
एकदा प्रचिती घेऊन
चित्ती आभूषण त्याचे लेवुन
जाऊ याच उपाये तरुन
श्रीरामा ,अद्भुत रस तुज अर्पण ॥

बिभित्स
अंग शहारले ,मन किळसले
नको नको झाले, दृश्य पुढचे
हे लक्षण बिभित्स रसाचे ॥
देहाचे दर्शन ओँगळवाणे ,
प्रदर्शन शृंगाराचे मांडणे ,
न आवडे नच साहवे ,
परी अपरिहार्य त्याचे असणे ॥
समजून  मनाने  घ्यावे
निर्मिले ज्याने त्या ठावे ॥
चित्त निश्चल ते ठेवुन
जाऊ याच उपाये तरुन
श्रीरामा ,बिभित्स रस तुज अर्पण ॥

भीती
थरकाप जीवाचा झाला ,
पाय जागेवर थाम्बला ,
अघटीत घटना घडती
श्वापदे , संहारक दृश्यं दिसती
सत्य, स्वप्न आणि कल्पनेची
भूते बसता डोक्यावरती
पाझरे तो रस भीती ॥
कधी भासे तो भीषण
रूप रौद्र ही त्याची खूण
व्यायाम मनास देऊन
कणखर चित्त ठेवून
जाऊ याच उपाये तरुन
श्रीरामा ,भीती रस तुज अर्पण ॥

शृंगार
प्रेमाची देहातून  अभिव्यक्ती
सौंदर्यात बहरते प्रीती
तेंव्हा ,
शृंगार रसात विहरते रती ॥
 प्रिया ,भार्या असती रती
न्हाती धुती होते धरती
सर्वां आकर्षून घेती
तेंव्हा
बहरतो शृंगार ॥
 गाभा याचा स्वभाविकता
रेषेपलीकडे बिभित्सता
संयम मनाशी घालून
चित्ती लालित्य ठेवून
  जाऊ याच उपाये तरुन
श्रीरामा ,शृंगार रस तुज अर्पण ॥

हास्य
आनंदाचे येता  उधाण ,निघून जाईल अवघा ताण
विनोद होता मोजून मापून ,
हास्य रस झरतसे ॥
थाम्बतील दुःखे पळभर ,उड़ता हास्याचे तुषार
त्यासाठी लागतो खोल विचार ,
अथवा होई उथळ हास्यरस॥
ज्ञान देणे सुगम ,हसवणे ते दुर्गम
त्या लागे निर्मळ मन
जे जाणेल दुःख आतून
ऐसी मशागत करून ,हास्याचे आनंदाचे बीज रोवून
जाऊ याच उपाये तरुन
श्रीरामा ,हास्यरस तुज अर्पण ॥

करूण
जीव कळवळला पाहून दुःख अपार
द्रवती नेत्र , काळीज गलबलले फार ।
दारिद्र्य आणि पोरकेपण ,
गात्रांत न उरला त्राण
पाहता  पाझरे, तो रस करूण ।
द्यावा मदतीचा हात ,चित्त शांत ठेवून
हेच उपायी जाऊ तरुन
श्रीरामा, करूण रस तुज अर्पण  ॥

प्रेम आणि शांत रस उरले दोन
'प्रेम' सर्व रसांचे मूळ ,'शांत' धरी वर आच्छादन ॥
प्रेम असता  'मी' वरती ,भीती ,बीभत्स ,वीर पाझरती
प्रेम उपजता दुसऱ्यासाठी  , करुणा, शृंगार हास्य स्त्रवती ॥
जेंव्हा जाऊ या साऱ्या पुढती ,
प्रेम, प्रीती, माया परमेश्वराप्रती
तेंव्हा च मिळेल समाधान शांती
हीच देईल आत्म्यास सद्गती ॥

श्रीराम जय राम जय जय राम ॥

नंदिनी